शिवप्रहार न्युज - खैरी निमगाव मध्ये ढंपर-पिकअपचा अपघात; बिअर बाटल्या पळवल्या...

खैरी निमगाव मध्ये ढंपर-पिकअपचा अपघात; बिअर बाटल्या पळवल्या...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- वाळूच्या ढंपर व मद्याची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाची समोरा-समोर जबर धडक होवून, झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर-कोपरगाव रस्त्यावर खैरी निमगाव परिसरात राजेंद्र बनकर यांच्या प्लॅन्टजवळ ही दुर्घटना घडली. दुपारच्या वेळी नायगाव येथे शासकीय वाळू लिलाव सुरू असल्याने वाळू डेपोवरून श्रीरामपूरकडे वाळूने भरलेला ढंपर क्रमांक (एमएच १४ डिएम ६४५२) व श्रीरामपूरहून पुणतांबा-कोपरगावकडे जाणाऱ्या मद्य भरलेला पिकअप (क्रमांक (एमएच १७ बिवाय ८६४४) या वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले.
ढंपर-पिकअपच्या धडकेनंतर ढंपर रस्त्याच्याखाली घुसला, तर पिकअपमधील विविध कंपन्यांच्या बिअरच्या बाटल्यांचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर अक्षरशः काचांचा खच पडला होता.यावेळी अनेक तळीरामांनी या अपघाताचा गैरफायदा घेत, बिअरच्या बाटल्या लंपास केल्या. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
दरम्यान तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि डौले,पोलिस उपनिरीक्षक मुरकुटे व पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन शिंदे ,रन्नवरे आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेजारच्या शेतात बिअरच्या बाटल्यांचा शोध घेतला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.