शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर MIDC तच बनवत होते ड्रग्ज….

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर MIDC तच बनवत होते ड्रग्ज….

श्रीरामपूर MIDC तच बनवत होते ड्रग्ज….

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर एमआयडीसीजवळ १४ मे ला छोटया हत्तीमध्ये पकडण्यात आलेले १४ कोटींचे ड्रग्ज (अंमली पदार्थ) हे श्रीरामपूर एमआयडीसीतच तयार केले जायचे अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे ज्याने हा उद्योग सुरू केला तो आरोपी हा केमिकल इंजिनिअर असून त्याचे वडील एसआरपीमध्ये होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

      याबाबतची अधिक माहिती अशी की, १४ मे ला रात्री पोलिसांनी एमआयडीसीजवळ छोटा हत्तीमध्ये हे १४ कोटींचे ड्रग्ज (अंमली पदार्थ) पकडण्यात आले होते. १४ पांढऱ्या गोण्यांमध्ये ही पांढरी पावडर तसेच ७ गोण्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटीक होते. बंदी असलेल्या अल्प्राझोलम हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे तेव्हा प्राथमिक तपासात पुढे आले होते. सदर प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

     या प्रकरणाचा तपास डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे हे करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील प्रमुख आरोपी विश्वनाथ शिपणकर हा केमिकल इंजिनिअर आहे. त्याचे धनगरवाडी, ता. राहाता येथे आजोळ आहे. त्यामुळे धनगरवाडी परिसर तसेच एमआयडीसीत त्याचे येणे-जाणे होते. शिपणकर तसा मुळचा दौंडचा, त्याचे वडील एसआरपीमध्ये होते, असे समजते. धनगरवाडी परिसरात ओळख असल्याने डिसेंबर २०२४ मध्ये विश्वनाथ शिपणकर याने एमआयडीसीमध्ये एक गाळा घेतला. त्याठिकाणी हॉस्पीटलमध्ये ऑपरेशनसाठी लागणारे सर्जिकल कॉटन तयार करण्याचे लायसेन त्याने मिळवले. हर्षा ॲग्रो नावाखाली त्याने मार्च २०२५ मध्ये या ठिकाणी व्यवसाय सुरू केला. मात्र, सर्जिकल कॉटन तयार करण्याऐवजी शिपणकर याने अंमली पदार्थ बनवण्याचा उद्योग सुरू केला. कराड येथील अमरसिंग देशमुख याच्याकडून शिपणकर हा कच्चा माल घ्यायचा आणि या कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या अंमली पदार्थाच्या मालात श्रीरामपूर एमआयडीसीतील आपल्या गाळयात करायचा आणि पक्का झालेला हा माल शिपणकर हा अमरसिंग देशमुखला पाठवायचा. अमरसिंग देशमुख हा सदर तयार झालेला अंमली पदार्थाचा पक्का माल हा तेलंगणात सप्लाय करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. 

        दरम्यान श्रीरामपूर एमआयडीसीतून शिपणकर ज्या कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करायचा तो अंमली पदार्थाचा माल हा अमरसिंग देशमुख हा तेलंगणाला पाठवायचा तेलंगणात देशमुख याच्यावर गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी तेथे त्याला पकडले होते. तेथे अटकेत असतानाच श्रीरामपुरात गुन्हा घडल्यानंतर अमरसिंग देशमुख याला श्रीरामपूरच्या पोलीस पथकाने तेलंगणामधून ताब्यात घेवून काल श्रीरामपुरला आणले. आता हा अमरसिंग देशमुख अजून कोणाकडून हा माल बनवायचा आणि आणखी कोठे कोठे सप्लाय करायचा? हे समजणार आहे.