शिवप्रहार न्युज - संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित चोरट्याचा एन्काऊंटर...

संभाजीनगरमध्ये दरोड्यातील संशयित चोरट्याचा एन्काऊंटर...
छत्रपती संभाजीनगर- संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयीत आरोपी चोरट्याचा सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. अमोल खोतकर असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे.वाळूज परिसरातील कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेले होते त्यावेळी हि घटना घडली.
दरम्यान एका बड्या उद्योजकाच्या घरावर 15 मे रोजी पहाटे दरोडा पडला होता.त्यावेळी ते कुटुंबीयांसह परदेशात गेले होते. त्यांचा केअरटेकर बंगल्यात होता.दरोडेखोरांच्या टोळीने त्याच्या डोक्याला बंदूक लावून घरातील सोने आणि चांदी लुटून नेली होती. या दरोड्यात घरातील सुमारे पाच किलो सोने (अं.पाऊणे पाच कोटी रुपयांचे) आणि 40 किलो चांदी, तसेच रोख रक्कम लुटण्यात आली होती. पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यानंतर ०५ आरोपींना अटक केली होती. अमोल खोतकर हा सहावा आरोपी होता.त्याच्याकडेच चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यामुळे पोलीस त्याला अटक करायला गेले होते.
पोलीसांचे पथक याठिकाणी पोहोचले तेव्हा गुन्हेगार अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता.पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अमोल खोतकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरु केला. असा पोलीसांचा दावा आहे. पोलीसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर जागीच मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या एन्काऊंटरची राज्यभर चर्चा चालू आहे.