शिवप्रहार न्युज - गावातील पाणी गावातच आडवा : केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील

गावातील पाणी गावातच आडवा : केंद्रीय जलशक्तीमंत्री सी.आर.पाटील
शिर्डी (शिवप्रहार न्युज)- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, गावातील पाणी गावातच अडवून साठवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा १ अंतर्गत गोदावरी उजवा तट कालव्यावरील मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण कामाचे भूमिपूजन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक, आमदार आशुतोष काळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आदी उपस्थित होते.
केंद्रीय जलशक्ती मंत्री पाटील म्हणाले की, संपूर्ण जगाच्या १८ टक्के लोकसंख्या आणि १८ टक्के पशुधन भारतात आहे. मात्र संपूर्ण जगाच्या केवळ चार टक्के पाणी भारतात आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करण्याची नितांत गरज आहे.
देशात दरवर्षी सुमारे ४ हजार बीसीएम पावसाचे पाणी मिळते, मात्र आपल्याला त्यापैकी केवळ १ हजार १२० बीसीएम पाण्याची गरज असते. आपण ७५० बीसीएम जलसंचय करतो आणि धरणांमध्ये २५० बीसीएम पाणी साठवतो. तरीही पाण्याची कमतरता आहे. एक धरण उभारण्यासाठी २५ वर्षे लागतात. मात्र तेवढा वेळ आपल्या हातात नाही, म्हणून पाण्याच्या बचतीची अत्यंत गरज आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या गावात व शेतात चार बाय चारचा सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात दगड-धोंडे टाकून नैसर्गिकरित्या जलसंचय करण्याची गरज आहे. अशा एका शोषखड्ड्याच्या माध्यमातून सुमारे पाच लाख लिटर पाणी जमिनीत मुरवता येते.
देशात तेरा लाख स्ट्रक्चर खड्यांच्या माध्यमातून पाणी संचय करण्याची चळवळ राबविण्यात आली. यातून लाखो लीटर पाण्याची बचत झाली, असेही त्यांनी सांगितले. तुमच्या भागात जर एक हजार शेतकरी तयार झाल्यास केंद्राच्या एजन्सीमार्फत याभागात पाणी संचय करणारे शोषखड्डे खोदून देण्यात येतील. या शोषखड्ड्यांद्वारे पाणी संचय झाल्यास पुढील वर्षी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही चळवळ राबवावी, अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी व्यक्त केली तसेच नदी-नाल्यांतील पुराच्या पाण्यापासून कॅनमध्ये पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी आजच आपण पाणी बचतीची चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना असलेल्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण देश दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे. उपलब्ध पाण्यात शेतीला सिंचन झाले पाहिजे यासाठी जलसंपदा विभागाचा प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचे स्वप्न पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांचे होते, ते स्वप्न माझ्या हातून होत आहे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. गोदावरी उजवा व डावा अशा दोन्ही कालव्यांचे काम पूर्ण करण्यात येईल. आज भूमिपूजन करण्यात आलेल्या कालव्याचे डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल.
राज्यशासन सुमारे एक लाख कोटींच्या खर्चातून चार नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यात ८३ टीएमसी पाणी आणणार असून यातून गोदावरी खोरे कायमचे दुष्काळमुक्त होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार आशुतोष काळे, आण्णासाहेब म्हस्के पाटील यांचेही भाषण झाले. शासनाने मागील काही वर्षांत राज्यातील १८२ प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यातून २५ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, असे प्रास्ताविकात दिपक कपूर यांनी सांगितले.