शिवप्रहार न्युज - व्यापाऱ्याचे ३.२६ कोटींचे सोने घेऊन ड्रायव्हर पसार...

शिवप्रहार न्युज - व्यापाऱ्याचे ३.२६ कोटींचे सोने घेऊन ड्रायव्हर पसार...

व्यापाऱ्याचे ३.२६ कोटींचे सोने घेऊन ड्रायव्हर पसार...

   शिर्डी (शिवप्रहार न्युज)- शिर्डीत एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाखांचे सोने व रोकड व्यापाऱ्याच्या ड्रायव्हरने (चालक) चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात) यांनी शिर्डी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

     खिशी हे सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन सात मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार हे देखील होते.ते 'हॉटेल साई सुनीता' मध्ये मुक्कामी होते. हे व्यापारी विविध सोन्याच्या दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी जात व रात्री हॉटेलमध्ये मुक्कामी येत. १३ मे रोजी रात्री त्यांनी दागिन्यांची बॅग बेड व टेबलच्या मध्ये ठेवली होती. रूम आतून बंद होती. काल १४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलतभाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता. त्याने आत पाहिले असता, चालक सुरेशकुमार रूममध्ये नव्हता. त्याचा मोबाईल आणि कपडे रूममध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर खिशी यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग तपासली असता त्यातील सुमारे ३.५ किलो वजनाचे ३ कोटी २२ लाख रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाखांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले.

       शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी वमणे, पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे, सहायक निरीक्षक निवांत जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली.आरोपीच्या शोधासाठी शिर्डी पोलिसांचे पथक रवाना झाले असून, त्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.