शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात पिण्याच्या तलावाचा भराव फुटून रस्ते पाण्याखाली...

श्रीरामपुरात पिण्याच्या तलावाचा भराव फुटून रस्ते पाण्याखाली...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) आज शुक्रवारी पहाटे गोंधवणी भैरवनाथनगर परिसरातील श्रीरामपूर नगरपालिकेचा नव्याने तयार होत असलेल्या पाणी साठवण तलावाचा भराव वाहुन गेल्यामुळे फुटला. त्यामुळे फरगडे वस्तीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेले.अनेकांच्या शेतात भर उन्हाळ्यात तळ्याचे स्वरूप आले होते.
श्रीरामपूरच्या नागरीकांना शनिवारसह दररोज पाणी देण्याच्या हेतूने नव्या तलावाला भराव टाकून त्यात पाणी साठवणे सुरु होते.मात्र,पाण्याचा प्रचंड दाब वाढल्याने भराव फुटुन लाखो लीटर पाणी वेगाने बाहेर आले. अनेकांच्या घरासमोर पाणीच पाणी झाले.या घटनेची माहिती सरपंच पती प्रवीण फरगडे यांनी मुख्याधिकारी व पालिकेला कळविली. तात्काळ मुख्याधिकारी मच्छींद्र घोलप यांनी तसेच पाणी पुरवठा प्रमुख बकाल यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी जेसीबी लावून भराव बुजविण्याचे व पाणी इतरत्र काढून देण्याचे काम सुरु होते. या प्रकरणी श्रीरामपूरात उलट सुलट चर्चा सुरु होती.
पाण्याचा प्रचंड दाब भरावाने कसा थोपून धरला जाईल हे ठेकेदाराला कळले नाही का? हे कोणाच्या हलगर्जीपणामुळे घडले ? संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोंधवणी, भैरवनाथनगर परिसरातील त्रस्त नागरीकांनी केली आहे. जर जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोणाला धरले असते ? तलावाचा भराव फूटून लाखो लिटर पाणी वाहून गेल्याने श्रीरामपूरकरांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते काय ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.