शिवप्रहार न्युज - हायकोर्टात तारखेला जाऊ नये म्हणून श्रीरामपुरात तरूणीला बॅटने मारहाण...

हायकोर्टात तारखेला जाऊ नये म्हणून श्रीरामपुरात तरूणीला बॅटने मारहाण...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- हायकोर्टात असलेल्या तारखेला महिलेने जाऊ नये म्हणून मारेकरी पाठवून तिला बॅटने मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार श्रीरामपूर शहरात घडला आहे.
याबाबत १८ वर्षे वयाच्या तरूणीने पोलिसात फिर्याद दिली आहे, त्यात म्हटले आहे की, लग्न झाल्यानंतर आपला पती हा वेडा असल्याचे आपल्याला काही दिवसांनी कळाले. तरी आपला संसार आपण गुण्यागोविंदाने करत असताना नवरा वेडा असल्याचा फायदा घेवून नवऱ्याच्या सख्या चुलत्याने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून लैंगिक छळ केला.म्हणून आपण त्याच्याविरूद्ध फिर्याद दिल्याने त्याच्यावर पोक्सो कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल झाला. सदर केसची तारीख ११ जून २०२५ ला छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्टात होती. सदर केस मागे घ्यावी म्हणून यापूर्वीच नवऱ्याच्या चुलत्याने आपणाला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
१० जूनला आपण साई कॉर्नर, गोपीनाथनगर,श्रीरामपूर येथे असणाऱ्या आजीकडे जाण्यासाठी रिक्षाने निघालो असता रिक्षा ड्रायव्हरने गौतमनगरजवळ रस्त्यावर रिक्षा थांबवली. तेव्हा तीन-चार जण रिक्षासमोर आले.त्यापैकी दोघांच्या हातात बॅट होत्या. पैकी एकजण म्हणाला की, तू येथे कशी? तेव्हा आपण रिक्षावाल्याला रिक्षा पुढे घ्यायला लावली. तेव्हा एकाने आपला गळा दाबला व आपल्याला रिक्षाच्या बाहेर ओढले. तेव्हा दुसऱ्याने त्याच्याकडील असलेल्या बॅटने मारायला सुरूवात केली. त्यांच्यात परशु (पुर्ण नाव माहीत नाही) याला आपण ओळखते. त्याने आपल्या हातावर, पायावर, डोक्यात बॅटने मारत जखमी करत आम्ही तुझ्या नवऱ्याच्या चुलत्याचे माणसं आहोत, तू उद्या कोर्टाच्या तारखेला गेली तर तुला जागीच ठार मारून टाकू, असे म्हणत गळा दाबल्याने आपण बेशुद्ध पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर तरूणीच्या फिर्यादीवरून तिच्या नवऱ्याचा चुलता तसेच शंकर (पुर्ण नाव माहीत नाही),परशु (पुर्ण नाव माहीत नाही) तसेच अन्य दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.