शिवप्रहार न्युज - खंडाळ्याला नशेच्या इंजेक्शनसह पकडलेला आरोपी पोलीस स्टेशनमधून पळाला...

शिवप्रहार न्युज -  खंडाळ्याला नशेच्या इंजेक्शनसह पकडलेला आरोपी पोलीस स्टेशनमधून पळाला...

खंडाळ्याला नशेच्या इंजेक्शनसह पकडलेला आरोपी पोलीस स्टेशनमधून पळाला...

  श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - जिममधील मुलांना नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या आरोपीला खंडाळ्याजवळ इंजेक्शनसह पकडण्यात आले. मात्र श्रीरामपूर शहर पोलीसांत त्याची पोलीस चौकशी करत असताना हा आरोपी काल सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

     याबाबतची अधिक माहिती अशी की,श्रीरामपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, खंडाळा येथे जावेद सिराज शेख, रा.लोणी, ता. राहाता हा खंडाळा येथील श्रीरामपूर-बाभळेश्वर रोडवरील काळे यांच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील रोडवर नशेचे इंजेक्शन विक्री करत आहे. परवाना नसताना सदर औषधांची खरेदी तसेच बिलाशिवाय त्याची विक्री ही जिममधील तरूणांना तसेच इतर ग्राहकांना करण्यासाठी आणले आहेत. तेव्हा पोलिसांनी काल दि. २४ फेब्रुवारी रोजी २ च्या - सुमारास सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपी जावेद शेख याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे परवाना नसलेल्या आणि शरीरास अपाय होऊ शकतो असे अपायकारक, गुंगीकारक औषधांचे इंजेक्शन आढळून आले. पोलिसांनी सुरूवातीला या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून शेख यांच्याकडून सेवन करण्याकरीता इंजेक्शनची मागणी केल्यानंतर पोलिसांनी सदर आरोपीला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी ८३,२३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात ३,०३२ रूपयांचे टरमीन इंजेक्शन तसेच ७५८ रूपयांच्या २ बाटल्या आणि ८०,००० रूपयांची सुझुकी मोटारसायकल ताब्यात घेतली. 

        सदर आरोपीला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तो सदर इंजेक्शन कोठून आणतो ? कोणाला विकतो ? आदी तपास पोलीस करीत असताना रात्री १.३० च्या सुमारास चौकशी सुरू असताना पोलिसांच्या हाताला झटका देवून हा आरोपी जावेद शेख पोलीस स्टेशनमधून पळाला. झटका देवून तो पोलीस स्टेशनच्या रूममधून बाहेर आल्यानंतर त्याने बाहेरून दरवाजाला कडी घातली व तो पळून गेला. श्रीरामपूर शहर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.