शिवप्रहार न्यूज- पोलिसांना मारहाण करून फरार झालेल्या आरोपींना संगमनेर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून पकडले.

पोलिसांना मारहाण करून फरार झालेल्या आरोपींना संगमनेर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून पकडले...
संगमनेर- संगमनेर मध्ये मागील आठवड्यात तीन बत्ती चौक व कमल पेट्रोल पंपाजवळ अनेक नागरिक गर्दी करून फिरत होते. कोरोना प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र या नागरिकांनी पोलिसांना जुमानले नाही. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी सौम्य लाठीमार केला असता तीन बत्ती चौकात मोठा जमाव जमा होऊन या जमावाने पोलीस वाहनावर तसेच पोलिसांच्या अंगावर दगडफेक करून तीन पोलिसांना मारहाण केली होती.तसेच पोलिस बंदोबस्तासाठी लावलेला मांडव सुद्धा या जमावाने तोडून टाकला होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या दिवशी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. मात्र इतर आरोपी हे फरार झाले होते. श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली काळे यांनी संगमनेरात बैठक घेऊन आरोपींना हजर करण्याची सूचना केली होती. मात्र एकही आरोपी पोलिसांसमोर हजर न झाल्याने पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे ठरवले. संगमनेरचे डिवायएसपी श्री.राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली आजूबाजूच्या पाच पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांना बोलावून घेण्यात आले आणि आरोपींच्या घराची झडती चालू झाली. या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये एकूण ०९ फरार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
या आरोपींना अटक केल्यानंतर काही लोकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती.पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रिजवान मोहम्मद खान ,इर्शाद अब्दुल जमीर, सय्यद जोएबअली शौकत सय्यद ,अर्षद जावेद कुरेशी ,मोहम्मद मुस्तफा फारूक कुरेशी,एजाज शेख नूर मोहम्मद शेख, फारूक बुराण शेख, अरबाज आजीम बेपारी यांचा समावेश आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.