शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरातील भांडणानंतर खून करणाऱ्या राहात्याच्या ०६ आरोपींना जन्मठेप...

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपुरातील भांडणानंतर खून करणाऱ्या राहात्याच्या ०६ आरोपींना जन्मठेप...

श्रीरामपुरातील भांडणानंतर खून करणाऱ्या राहात्याच्या ०६ आरोपींना जन्मठेप...

   राहाता/श्रीरामपूर- (शिवप्रहार न्युज)-

राहाता शहरातील योगेश किसन वाघमारे या तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारल्याच्या गुन्ह्यातील 18 पैकी 6 आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर उर्वरित 12 आरोपींना निर्दोष सोडले. राहाता येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला आहे.

      दि. 23 मे 2022 रोजी श्रीरामपूर येथील एका हॉटेलात झालेल्या भांडणाच्या कारणावरून राहाता येथील फिर्यादी किसन वाघमारे यांचा मुलगा योगेश किसन वाघमारे रा. राहाता यास आरोपी ललित पाळंदे, राहुल धीवर यांनी त्याला मोटरसायकलवरून पळवून नेवून आंबेडकरनगर मधील संजय दादा निकाळे यांच्या घरी नेले. तेथे रवी दशरथ कटारनवरे, विरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, दशरथ कटारनवरे, भूषण संजू निकाळे, योगेश निकाळे, संजय दादू निकाळे, रतनबाई दशरथ कटारनवरे, मनीषा वाघमारे, अमित चंद्रकांत वाघमारे, संगीता संजय निकाळे, उत्कर्ष उर्फ भैय्या सोमनाथ लुटे, सोमनाथ लुटे, विशाल मोकळ, महेश सोमनाथ पाळंदे, गौतम सोमनाथ पाळंदे, अमोल सोमनाथ पाळंदे सर्व रा. राहाता यांनी एकत्रित येऊन संगनमत करून जबर मारहाण केली. 

     रवी कटारनवरे याने योगेश वाघमारे यांच्या छातीत तलवारीने तसेच संजय निकाळे, ललित बाबासाहेब पाळंदे यांनी कोयत्याने डोक्यात व हाताच्या बोटावर वार करून योगेश वाघमारे याला जीवे ठार मारले. तर साक्षीदारांना जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून राहाता पोलीस स्टेशनला एकूण 18 आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला होता.

      सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय राहाता यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सबळ पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून 18 आरोपींपैकी राहुल एकनाथ धीवर, ललित बाबासाहेब पाळंदे, रवी दशरथ कटारनवरे, विरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, विशाल मायकल मोकळ, योगेश संजय निकाळे सर्व रा. आंबेडकरनगर या सहा जणांना अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी 35 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील डी. बी. पानगव्हाणे, पी. व्ही. बुलबुले यांनी काम पाहिले. त्यांना सरकारी वकील मयुरेश नवले यांनी सहाय्य केले.

     दरम्यान आरोपींना काय शिक्षा होती हे ऐकण्यासाठी न्यायालयाबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या गुन्ह्यतील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.