शिवप्रहार न्युज - शिरसगावच्या तरूणाला मारहाण करून पत्नीला पळवले;आळंदीला केला होता विवाह...

शिरसगावच्या तरूणाला मारहाण करून पत्नीला पळवले;आळंदीला केला होता विवाह...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहराजवळील शिरसगाव येथे विवाहानंतर पत्नीबरोबर राहत असलेल्या तरूणाला मारहाण करून पत्नीच्या वडीलांसह ६ जणांनी घरातून त्याच्या पत्नील पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसगाव येथे राहणारा तरूण अमोल रामदास कदम याचा सोनाली नावाच्या तरूणीशी तिच्या घरच्यांच्या इच्छेविरूद्ध ३ जानेवारी २०२५ रोजी आळंदी येथे एका मंगल कार्यालयात विवाह झाला होता. त्यानंतर दोघे शिरसगाव येथे राहत होते. रविवार दि.२६ जानेवारी रोजी अमोल, त्याची पत्नी सोनाली आणि आई हे घरी दुपारी २ वा. जेवण करीत असताना तेथे सोनाली हिचे वडील ज्ञानेश्वर वारकर, पोपट ज्ञानेश्वर वारकर, पप्पू बिलोरे, बाळू वारकर, पिनाबाई वारकर, भागूबाई बिलोरे यांनी येवून घरात घुसून अमोल याला तू आमच्या मुलीला पळवून नेवून जबरदस्तीने लग्न केले आहे का ? तुमचा बेतच पाहतो, असे म्हणत शिवीगाळ करून त्याला जमिनीवर आपटून जबर मारहाण केली. यावेळी अमोलची आई त्याला सोडवण्यासाठी आली असता त्यांनाही पिनाबाई वारकर आणि भागूबाई बिलोरे यांनी केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि अमोल याची पत्नी सोनाली हिला घरातून जबरदस्तीने घेवून जात तुम्ही पुन्हा आमच्या नादी लागले तर जिवे ठार मारू, अशी धमकी दिली.
याप्रकरणी अमोल कदम या तरूणाने श्रीरामपुर शहरपोलिसात फिर्याद दिल्यावरून घरात घुसून मारहाण करून पत्नी सोनाली हिला घेवून जाणाऱ्या ज्ञानेश्वर वारकर, पोपट ज्ञानेश्वर वारकर, पप्पू बिलोरे, बाळू वारकर, पिनाबाई वारकर, भागूबाई बिलोरे, सर्व रा. खोपडी, ता.कोपरगाव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.