शिवप्रहार न्यूज -चित्रकला माणसाला जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवते- शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर.

शिवप्रहार न्यूज -चित्रकला माणसाला जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवते- शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर.

चित्रकला माणसाला जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवते- शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर...

श्रीरामपूर -

आपण शाळेत काटकोण, त्रिकोण, चौकोण शिकतो मात्र कला माणसाला दृष्टीकोण शिकवते, जगायला शिकवते, निसर्गाच्या जवळ नेऊन जीवनाचा आस्वाद घ्यायला शिकवते. इतकेच नव्हे तर माणसाला सृजनशील, सर्जनशील बनवते. मुलांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवायचे असेल, त्यांना निर्णयक्षम बनवायचे असेल तर चित्रकला हे महत्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे संयोजक तथा शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केले.

            रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यावतीने आयोजित कार्टून कार्यशाळेतील पालकांच्या ऑनलाईन मेळाव्यात मार्गदर्शन करताना चासकर बोलत होते. यावेळी राज्याच्या विविध भागातील पालक, विद्यार्थ्यांसह चित्रकार भरतकुमार उदावंत, रवी भागवत, सुप्रसिद्ध निवेदक संतोष मते आदी ऑनलाईन उपस्थित होते. प्रारंभी स्वागत उदावंत यांनी केले. मते यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भागवत यांनी कोरोना विषयावरील व्यंगचित्र रेखाटून मेळाव्यास सुरूवात केली.

           चासकर पुढे म्हणाले, जगात सद्गुणांचा पुतळा कोणीच नाही. मग तुमचे मूल कसे असेल. त्याला जगातील प्रत्येक गोष्ट यायला हवी हा हट्ट धरणे चुकीचे आहे. शाळा म्हणजे केवळ विषय शिकविण्याचे ठिकाण आहे असे समजू नका. तर शाळा ही मुलांच्या विकासाचे केंद्र आहे. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे मुले घरात असल्याने आनंदाचा निर्देशांक कमीकमी होत आहे,त्यांची कुचंबना होतेय.शिकणे ही सामुहीक प्रक्रिया असते. मात्र शाळा बंद असल्याने त्यांची ‘क्रिएटिव्ह एंगेजमेंट’ होत नाही. ही उणीव रंगलहरी आर्ट ॲकडमीच्या माध्यमातून भरतकुमार उदांवत व रवी भागवत भरून काढीत आहेत. आणि अशा कार्यशाळांमध्ये मुलांना सहभागी करून पालक आपली संवेदनशीलता सिद्ध करीत आहेत.

                प्रास्ताविक करताना भागवत म्हणाले, कोरोनामुळे शिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन कार्यशाळा सुरू केल्याने जगभरातील विद्यार्थी आपापल्या घरातूनच चित्रकलेचे शिक्षण घेऊ लागले आहेत. या नैराश्याच्या वातावरणात चित्रकलेमुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात आनंदाचा अंकूर उमलवू शकलो याचा आनंद वाटतो. 

              या मेळाव्यास डॉ. हर्षदा पवार (सांगली), शितल तांबडे (मिरज), रंजना गायकवाड (अकोले) कविता पिंपलीकर (ठाणे), चित्रकार राहूल पगारे (सिन्नर), रविंद्र निकम (कोपरगाव), प्रणिता शिपूरकर (भांडूप), किर्ती मुसमाडे (देवळाली प्रवरा), मंजीरी जमदाग्नी (पुणे), सीमा महाले (श्रीरामपूर), डॉ. सुधीर दिघे (पुणे), डॉ. मिनाक्षी कुंभार (सांगली), अनंत पाटील (पुणे) आदींसह राज्यभरातील पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुत्रसंचालन करून आभार संतोष मते यांनी मानले.