शिवप्रहार न्युज - गोंधवणीत बिबट्याचा वावर;डोळ्यादेखत शेळी नेली...

गोंधवणीत बिबट्याचा वावर;डोळ्यादेखत शेळी नेली...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) – शहराजवळ असणाऱ्या गोंधवणी शिवारात बिबट्याचा वावर असून तेथे बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेतला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी रात्री लोकांना बिबट्या दिसत आहे. पंधरा दिवसांपूर्वीही या भागात बिबट्याने कालवड फस्त केली होती. नेहमीप्रमाणे राजेंद्र लक्ष्मण बागूल हे गोंधवणीतील न्यू इंग्लिश स्कूलच्या रस्त्यावर शेळ्या चारत होते. सायंकाळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळीवर हल्ला चढविला व तिला पकडून त्याने ऊसाच्या शेतात धाव घेतली. बागूल यांनी आरडोओरड केला. पण तोपर्यंत बिबट्या आपली शिकार घेऊन पसार झाला होता.
बिबट्याचा वावर असल्याने शेतात जाण्यास शेतकरी धजावत नाहीत. त्यामुळे त्वरीत पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करण्यात यावे अशी मागणी होत आहे.